श्रद्धा तेथे देवाचा अधिवास : हभप मोरदे महाराज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवपुराणातील कथा मनापासून श्रद्धेने श्रवण करावी. मनात अविश्वास असेल तर फळ मिळत नाही. जेथे श्रद्धा तेथे देवाचा अधिवास असतो. शिव महापुराण कथेमुळे भगवान शंकराची आराधना करण्याचे भाग्य लाभते असे मार्गदर्शन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.

शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्री दत्त मंदिर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका मंगला संजय चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हभप देवदत्त मोरदे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून शुक्रवारी १३ जानेवारी रोजी श्री शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला.

सुरुवातीला परिसरातील ग्रामदैवतांची पूजा करण्यात आली. त्यानंतर भगवान शंकरांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सर्व दैवतांचे पूजन झाल्यानंतर दुपारी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कथेस प्रारंभ केला.

केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भगवान शंकराची आराधना केली जाते. सर्वात प्राचीन देवतेमध्ये भगवान शिवाचे मोठे स्थान आहे. भगवान शिव हे सृष्टीचे पालनकर्ता आणि उद्धारक मानले जातात. त्यांच्या इच्छेनेच सृष्टीचे आविर्भवन आणि त्यांच्या इच्छेनेच विनाश होतो. भगवान शिव हे पंचदेवांमध्ये प्रधान आणि अनादिसिद्ध परमेश्वर आहेत, असेही मोरदे महाराज यांनी सांगितले. श्री शिव महापुराण कथेमध्ये शनिवारी १४ जानेवारी रोजी हभप मोरदे महाराज शिवलिंगाचे अनन्यसाधारण महत्व विशद करणार आहेत. भाविकांनी कथा श्रवणासाठी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content