जळगाव प्रतिनिधी । मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास येत्या हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता तातडीने संबंधित सर्व तालुक्यात मका पिक क्षेत्राचे सर्व्हेक्षण करुन मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविण्यात येत आहे.
या खरीप हंगामात मका पिकावर सुरुवातीलाच पुणे, सोलापुर, नाशिक, अहमदनगर, बुलढाणा या जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसुन येत आहे. या कीडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजनांचा अवलंब करावा.
शेताला रोजच्या रोज भेट देऊन पिकाचे निरीक्षण करावे व किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच नियंत्रण उपायांचा अवलंब करावा, पिकाच्या पानांवरील अंडीपुंज, समुहातील लहान आणि मोठ्या अळया हाताने वेचुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात, सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग लिंग प्रलोभन सापळ्यामध्ये आकर्षित करुन मारावेत त्यासाठी प्रती एकरी 15 लिंग प्रलोभन सापळे लावावेत. तसेच या किडीच्या सर्वेक्षणासाठी प्रती एकरी 5 लिंग प्रलोभन सापळे लावावेत. मक्याच्या शेतात हेक्टरी 20 ते 25 पक्षी थांबे लावावेत.
जैविक उपाय (प्रती 10 लीटर पाणी) खालीलपैकी एक पर्याय वापरावा – रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे), निंबोळी अर्क 5%, अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली, मेटा-हायझियम ॲनिसोप्ली 50 ग्रॅम, मेटा-हायझियम (नोमुरिया) रिलाई 50 ग्रॅम, बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम, रासायनिक उपाय (प्रती 10 लीटर पाणी) खालीलपैकी एक पर्याय वापरावा- मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त झाडे)
विशेष सुचना
खालील रासायनिक किटकनाशकांचे अवशेष मका पिकामध्ये जवळजवळ 30 ते 58 दिवस राहतात म्हणून मका हे चारा पिक म्हणून घेताना रासायनिक किटकनाशकांची फवारणी करु नये. क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% एससी 4 मिली, स्पिनेटोराम 11.7% एससी 5 मिली, थायोमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी 2.5 मिली याप्रमाणे औषध पोंग्यात पडेल याची दक्षता घ्यावी, भैतिक उपाय पोंग्यामध्ये वाळु व चुना यांचे 9.1 मिश्रण करुन टाकावे. असे आवहन कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.