मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्था ।  केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांच्या भावाला बेड मिळत नाहीय. त्यांना बेड मिळण्यासाठी मदत करावी असं आवाहन जनरल व्ही.के.सिंग यांनी ट्विटरवर केलं आहे. गाजियाबादमध्ये त्यांचा भाऊ कोरोनाग्रस्त असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

जनरल व्ही.के.सिंग हे मोदी सरकारमधले फक्त मंत्री एवढीच त्यांची ओळख नाही तर ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जर बेड मिळत नसेल तर उत्तर प्रदेशातही कोरोनाची काय स्थिती आहे याचा अंदाज बांधलेलाच बरा.

 

केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करुन ट्विट केलं आहे. आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना संसर्ग झालेला असून त्याच्या उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही. कृपया तुम्ही लक्ष घाला असं आवाहन व्ही.के. सिंग यांनी केलं आहे.  व्ही. के. सिंग यांनी यामध्ये  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माहिती सल्लागार शलभ त्रिपाठी आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज सिंह यांना टॅग केलं आहे. उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्र्यांच्या नातेवाईकाला बेड मिळत नसल्याचं या ट्विटमुळं समोर आलं आहे.

 

उत्तर प्रदेशातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शनिवारी राज्यात 27 हजार 357 नवे रुग्ण समोर आले. तर 120 जणांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 9 हजार 703 जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content