मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सरकारची जबाबदारी आहे. यात नियमाचा भंग झाल्यास आवश्यक ती कारवाई पोलिसांनी करावी, असे गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले.
भोंग्यांसदर्भात महाविकास आघाडी सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी राज्यातील सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावलं होतं. परंतु अनेक पक्षांचे प्रतिनिधी गैरहजर होते. कायदा सुरक्षा राखण्यासाठी जी कारवाई करावी लागेल ती राज्य सरकारने करावी असे यावेळी ना. वळसे पाटील म्हणाले.
केंद्र सरकारनेच राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावे
सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदुषणाबाबत २००५ मध्ये निर्णय आदेशानुसार राज्य सरकारने देखील २०१५ ते २०१७ या दरम्यान शासन निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार लाऊडस्पीकरचा वापर, परवानगी, अटी, शर्थी, वेळ आणि आवाजाची मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आतापर्यत राज्यात लाऊडस्पीकरचा वापर होत आहे. परंतु भोंग्यासंदर्भात केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावे, गेल्या काही दिवसात भोंग्यांच्या वापरासंदर्भात इशारे दिले जात असून याबाबत सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही. भोंगे ज्यांनी लावले आहेत, वापर होत आहे, त्यांनीच विचार करायचा असल्याचेही ना. दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.