१० मार्च रोजी शेतकऱ्यांकडून देशभरात रेल्वे रोको आंदोलन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | शेतकऱ्यांनी त्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना ६ मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. शेतकरी नेत्यांनी 10 मार्च रोजी ‘रेल्वे रोको’ आंदोलनाची घोषणाही केली आहे. सध्याच्या आंदोलनस्थळी शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करत आहे, ज्यामध्ये त्यांची एमएसपीची मागणी महत्त्वाची आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी शंभू आणि खनौरी आंदोलनस्थळी आंदोलन करत राहतील, असा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला. दरम्यान, संघटनांनी इतर राज्यातील शेतकरी आणि मजुरांना 6 मार्च रोजी राष्ट्रीय राजधानीत आंदोलन करण्यासाठी दिल्ली गाठण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांनी रविवारी देशभरातील शेतकऱ्यांना 6 मार्चला दिल्ली गाठून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी 10 मार्च रोजी देशभरात चार तास ‘रेल्वे रोको’ आंदोलनाची हाक दिली होती.

Protected Content