भुसावळात प्रवाशावर चाकूहल्ला; आरोपीस सात वर्ष सक्तमजूरी

chaku halla

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे स्थानकावर पैशांच्या वादातून रेल्वे प्रवाश्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन उर्फ श्रावण घिसुलाल काजदेकर रा. धारणी जि. अमरावती याला सात वर्षाची सक्तमजूरी आणि पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा न्या.एस.बी.भन्साली यांनी सुनावली.

रोहितप्रसाद नर्मदाप्रसाद तिवारी (ललितपूर, जि.बीना, मध्यप्रदेश) हा सोल्यूशनचा नशा करीत असताना संशयीत आरोपी अर्जुन काजदेकर याने सोल्यूशनच्या पैशांवर तिवारी याच्याशी वाद घातल्यानंतर जवळच जेवण करीत असलेल्या शाहीन बेगम व प्रवीण सिसोदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी आरोपीने खिशातून चाकू काढत तिवारी याच्या पोटावर मारला होता. तिवारी यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर पोलिस नाईक दिनकर हरी कोळी यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात फिर्यादीसह १० साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक उज्ज्वल व्ही.पाटील यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार समीना तडवी तसेच केस वॉच म्हणून नाईक दुर्योधन शंकर तायडे यांनी काम पाहिले. आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस ७ वर्ष सक्तमजुरी तसेच ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.विजय खडसे यांनी काम पाहिले.

Protected Content