रियाची न्यायालयीन कोठडी वाढली

 

मुंबई: वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू च्या गुन्ह्याशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा गुन्ह्यात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. असं असलं तरी विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ पुरवठा गुन्ह्यात आरोपी असलेले सुशांतचे मदतनीस सॅम्युएल मिरांडा व दीपेश सावंत यांच्यासह कथित अमलीपदार्थ विक्रेता अब्देल बसित परिहार या तिघांचा तुरुंगातील मुक्काम २९ सप्टेंबरपर्यंत वाढण्याची चिन्हे आहेत. कारण ‘अमलीपदार्थांची तस्करी व पुरवठा ही अत्यंत गंभीर समस्या असून यात कोणताही आदेश दिला तर तो अनेक प्रकरणांवर परिणाम करणारा ठरणारा असेल. त्यामुळं यातील महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांविषयी केंद्र सरकार व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आपले उत्तर दाखल करायला हवे’, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून आणि तसे निर्देश देऊन उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला ठेवली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अमली पदार्थांसंबंधीची चौकशी आणखी संकटात आली आहे. ही चौकशी करणाऱ्या नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) चार अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अटकेतील एक दलालही बाधित झाला आहे. सुदैवाने विशेष पथकात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआय करीत आहे. त्यादरम्यान सीबीआयला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा संबंध अमली पदार्थांशी असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे एनसीबीने तपास सुरू केला.

एनसीबीनेच रिया व शौविकसह अन्य संबंधितांना अटक केली आहे. काही दलालांनाही अटक केली आहे. परंतु सुशांतसिंहची माजी व्यवस्थापिका श्रृती मोदी व रियाला अमली पदार्थांसंबंधी माहिती देणारी जया शाह, या दोघांची चौकशी कोरोना संकटामुळे मागील आठवड्यात थांबली. हे संकट आता आणखी वाढले आहे.

Protected Content