जळगाव प्रतिनिधी । शहरातील भिलपुरा पोलिस चौकीसमोर बंदोबस्तावर असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्याला दोन जणांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त असल्याने महापालिका कर्मचारी सय्यद नासिर अली शौकत अली वय ४५ रा. बालाजीपेठ हे अग्निशमन वाहन घेऊन भिलपुरा पोलिस चौकीसमोर नागोरी डेअरीजवळ उभे होते. याठिकाणी गाडी उभी केल्यावरुन ताज मोहम्मद फते मोहम्मद व शेख करीम शेख ताज मोहम्मद दोन्ही रा. भिलपुरा या दोघांनी सय्यद नासीर अली यांच्यासोबत वाद घातला. वादात ताज मोहम्मद याने शिविगाळ केली तर शेख करीम याने सय्यद नासीर यांच्या कानशिलात लगावली. घटनास्थळावरील इतरांनी मारहाण करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही दोघांनी सय्यद नासीर यांना आमच्या नांदी लागू नको, येथे गाडी लावू नको, जर गाडी लावली तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी महापालिका कर्मचारी सय्यद नासिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी ताज मोहम्मद पत्ते मोहम्मद व शेख करीम शेख ताज मोहम्मद दोन्ही रा. भिलपुरा या दोघांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे हे करीत आहेत