जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची भूमिका महत्वाची 

 

धरणगाव : कल्पेश महाजन

 

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी व भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार हे स्पष्ट आहे. परंतु धरणगाव व जळगाव तालुक्यात शिवसेनेने भाजपला मदत केली तरच ही लढत चुरशीची होईल,अन्यथा ही निवडणूक भाजपला जड जाण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेने धरणगावात भाजपचा प्रचार न करण्याचा ठराव नुकताच पारित केलाय. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची महत्वाची भूमिका ठरणार आहे.

 

धरणगाव तालुक्यात असा प्रचार सुरू आहे की, शिवसेना पूर्णपणे राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा देईल. कारण देवकर लोकसभेत गेल्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची वाट मोकळी होईल. स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार ए.टी.पाटील यांच्याबद्दल धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या सहानभूती दिसून येत आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तिकीट अगोदर राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांना मिळणार अशी चर्चा होती. परंतु माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनाच अखेर राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले आहेत. जळगाव,धरणगाव,एरंडोल,पारोळा आदी तालुक्यांमध्ये शिवसेनेची मोठी ताकत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेनेत शिवसेना नेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच नगरसेवक, पं.स.,जि.प सदस्य देखील शिवसेनेचे जास्त आहेत. त्यामुळे शिवसनेच्या सहकार्याशिवाय भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य आहे. एकंदरीत भाजपकडून शिवसेनेची कशी समजूत घालण्यात येते, हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

Add Comment

Protected Content