भारतीय जवान सीमेवर चिनी सैनिकांशी भिडले

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । नियंत्रण रेषेवर चीनने फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी हा प्रयत्न हाणून पडला. या धुमश्चक्रीत २० चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये तीन दिवसांपूर्वी सिक्कीम येथील नाकुला येथे ही धुमश्चक्री उडाली. चिनी सैनिकांच्या गस्ती पथकाने भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यात चीनच्या सैनिकांना गंभीर दुखापत झाली आहे. चीनचे २० सैनिक जखमी झाले असून काही भारतीय जवानही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिलेला नाही. या घटनेनंतर सिक्कीममध्ये तणावपूर्ण वातावरण झालं होतं. मात्र, आता परिस्थिती निवळल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भारत आणि चीनमधील तणाव निवळण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर २०२० मध्ये करार केला होता. मात्र कुरापतखोर चीनने या कराराचं उल्लंघन करणं सुरू केलं आहे. चीनने या कराराचा भंग करत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची जमावजमव केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

 

चीनी सैन्याने चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर संयुक्त निवेदन जारी केलं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यबळ न वाढवण्याचा आणि कुणाच्याही भूमीवर कब्जा न करण्याचं या निवेदनाद्वारे जारी करण्यात आलं होतं. यावेळी भारत आणि चीनने एकमेकांचा विश्वास घात न करता कराराचं पालन करण्याचाही निर्णय घेतला होता. आता चार महिने उलटत नाही तोच त्या निवेदनाच्या उलट भूमिका घेत चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्याची जुळवाजुळव केली आहे. चीनच्या या कुरापतीमुळे भारतासमोरही कोणताच पर्याय उरला नाही. त्यामुळे भारताने तणावग्रस्त भागात सैन्याची जुळवाजुळव केली आहे. काही सेक्टर्समधील चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडूनही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत.

भारताच्या हद्दीत चीन घुसखोरी करत आहे. पण ५६ इंचीची छाती असणारे गेल्या काही महिन्यापासून चीनच्या कुरापतींवर मौन बाळगून आहेत. त्यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. कदाचित ‘चीन’ हा शब्द शिकण्याचा ते प्रयत्न करत असतील, अशी खोचक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केली आहे.

Protected Content