भंडाऱ्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक वर्धा जिल्हा रुग्णालयात पून्हा रुजू !

 

भंडारा : वृत्तसंस्था । भंडारा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. प्रमोद खंडाते पुन्हा आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. डॅा. खंडाते वर्धा जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोग्य उपसंचालक डॅाक्टर संजीव जायसवाल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. १० नवजात बाळ मृत्यू प्रकरणात डॅा. प्रमोद खंडाते यांना निलंबीत करण्यात आलं होतं. पण आता ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नेमकी कशी कारवाई केली असा प्रश्न आता जनतेमधून विचारला जात आहे.

काही दिवसांआधीच राज्य सरकारने या प्रकरणात मोठी कारवाई केली होती. या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात आली होती. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांना निलंबित करण्यात आलं होतं. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली होती. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. पण आता प्रमोद खंडाते यांच्या कामावर रुजू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.

रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली .

Protected Content