भारतीय जवानांच्या आक्रमकतेमुळे चीन हडबडला

बीजिंग, वृत्तसंस्था । भारत आणि चीन दरम्याच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढतच आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीनने आपल्या सैन्याची कुमक वाढवली आहे. भारतीय जवानांनी दाखवलेल्या आक्रमकतेमुळे चीनदेखील हडबडला असून त्यांनी देशभरातून सैन्याला तैनात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जवानांनी काही उंचावरील टेकड्यांचा ताबा मिळवल्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चीनच्या सोशल मीडियावरही भारतीय जवानांची चर्चा सुरू आहे.

चीनच्या सोशल मीडियावर लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत. यामध्ये भारतीय जवानांची स्थिती दर्शवण्यात येत आहे. हे छायाचित्रे चिनी उपग्रह Gaofen-2 ने घेतली आहे.स्पांगुरमध्ये भारतीय जवानांनी उंचावर ताबा मिळवला असल्याचे दिसत असून चिनी लष्कराचे कॅम्प खालील बाजूस दिसत आहेत.

याआधी देखील चीनच्या सोशल मीडियावर भारतीय जवानांच्या हालचालीचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यामध्ये पॅन्गाँगच्या दक्षिण भागात चिनी लष्कराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय जवानांनी कॅम्प उभारले असल्याचे आढळून आले होते.

चीनने ब्लॅकटॉप हिलच्या परिसरात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली असल्याचे समोर आले होते. या भागात भारतीय जवानांकडून कोणतीही हालचाल होऊ नये आणि झाल्यास त्याला प्रत्युत्तर देता यावे यासाठी चीनने सैन्याची जमवाजमव केली आहे. भारतीय जवानांनी दाखवलेल्या आक्रमकतेमुळे चीनला धक्का बसला आहे.

चिनी लष्कराच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता भारतीय लष्कर अधिकच सतर्क झाले आहे. भारतीय जवानांनी चिनी सैन्याच्या कॅम्पवर देखरेख ठेवण्यासाठी उंचावरील ठिकाणांवर कॅम्प उभारले आहेत. त्याशिवाय सामरीकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या फिंगर २ आणि फिंगर तीन या भागात आपल्या जवानांची संख्या वाढली आहे. भारतीय जवानांनी ठाकुंगपासून रेक इन दर्रा आदी भागातील महत्त्वाच्या शिखरांवर मोर्चेबांधणी आणखी मजबूत केली आहे.

Protected Content