चीनला आता अमेरिकेच्या हल्ल्याची भीती

बीजिंग वृत्तसंस्था । दक्षिण चीन समुद्रात तैवानसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनला आता अमेरिकेच्या हल्ल्याची भीती वाटू लागली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानापूर्वी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजीन यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी ट्रम्प हे पाऊल उचलू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. हु शिजीन यांनी ट्विट करून म्हटले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत विजयी होण्यासाठी दक्षिण चीन समुद्रातील चीन अखत्यारीत असणाऱ्या बेटांवर MQ-9 रीपर ड्रोनने क्षेपणास्त्र हल्ला करू शकतात. अर्थात अमेरिकेने हल्ला केल्यास त्यांना चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान जोरदार पलटवार करतील आणि यु्द्ध छेडणाऱ्यांना धडा शिकवतील असेही त्यांनी म्हटले.

तैवानच्या मुद्यावर चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढत चालला आहे. याआधी अमेरिकन सैन्य तैवानमध्ये पुन्हा शिरल्यास चीन युद्ध छेडणार असल्याची धमकी ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली होती. ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शिजीन यांनी अमेरिका आणि तैवानला धमकी दिली होती.

तैवानमध्ये अमेरिकेने आपले सैन्य पाठवल्यास चीनकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने विश्लेषकांच्या हवाल्याने म्हटले. अमेरिकेने सैन्य पाठवल्यास चीन आणि अमेरिकेत झालेला करार मोडीत निघेल. अमेरिकेने सैन्य तैवानमध्ये दाखल करण्याचा प्रस्ताव हा तैवानच्या नागरिकांविरोधात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकन सैन्याने तैवानमध्ये शिरकाव केल्यास चीन प्रत्युत्तरात कारवाई करेल आणि ताकदीच्या बळावर तैवानचे चीनमध्ये विलनीकरण करेल.

आशिया खंडात चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घालण्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी घट्ट होत आहे. चीनला वेसण घालण्यासाठी भारत आणि जपान एकत्र येणार असून जपानचे पंतप्रधान सुगा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांतील आर्थिक आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. इंडो-पॅसिफिक भागासाठी भारत-जपान-ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सुगा यांनी म्हटले. या चारही देशांनी चीनविरोधात ‘क्वाड’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content