मुंबई (वृत्तसंस्था) भारतामध्ये निवडणुका बंद करुन आयपीएलमधील लिलावाप्रमाणे पद्धत सुरु करावी. त्यामुळे निवडणुकीवर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आपला वेळही वाचेल, अशा कडवट शब्दात मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केली आहे.
अनुभव सिन्हा यांनी आपल्या एकामागोमाग केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, खरंच कमाल आहे आपल्या देशाची. दर दोन महिन्यांनी आपण निवडलेले नेते बसेसमध्ये भरुन भरुन लोकांसमोरून छुप्या जागी घेऊन जातात कारण ते विकले जाऊ नयेत. टीव्हीवर यासंदर्भात चर्चासत्रे होतात आणि आपण बघत राहतो. ते नेते बसच्या खिडक्यांमधून विजयीमुद्रेमध्ये अभिवादन करत असतात. यंदा आम्ही विकले गेलो नाही पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करु असेच ते म्हणत असतील. भारतामध्ये निवडणुका पद्धत बंद करुन आयपीएलमधील लिलावाप्रमाणे पद्धत सुरु करावी. त्यामुळे अनेक भाषणे आणि निवडणुक प्रचारसभाही घ्याव्या लागणार नाही. देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देण्यासाठी वेळही मिळेल.. काय बरोबर बोलतोय ना?, असे सिन्हा यांनी ट्विट केले आहे.