भारताने तिसऱ्या सामन्यासह टी-२० मालिका गमावली

हॅमिल्तन (वृत्तसंस्था) न्यूझीलंडच्या भूमीवर ऐतिहासीक कामगिरी करण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाने पुन्हा एकदा गमावली आहे. अखेरच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतावर चार धावांनी मात करत तीन सामन्यांची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 208 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीत ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.
न्यूझीलंडच्या मिचेल सँटरन आणि डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना माघारी धाडलं. इतर गोलंदाजांनीही त्यांना चांगली साथ दिली. तिसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली असती तर हा न्यूझीलंडच्या भूमीवरचा त्यांचा पहिला टी-20 मालिका विजय ठरला असता. मात्र यासाठी भारतीय संघाला आणखी वाट पहावी लागणार आहे.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आला. सिफर्ट आणि मुनरो या जोडीने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी करुन आपल्या संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. यानंतर कुलदीप यादवने दोन बळी घेत भारताला यश मिळवून दिलं. मात्र यानंतर कर्णधार केन विल्यमसन, अष्टपैलू कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी फटकेबाजी करत आपल्या संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. आजच्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांचं गचाळ क्षेत्ररक्षण संघाला चांगलचं भोवलं, ज्याचा फायदा घेत न्यूझीलंडने भारतासमोर 213 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं.

Add Comment

Protected Content