भारतातला महागाईचा दर असह्य

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतामधली महागाई असह्य पातळीवर पोचली असल्याचे मूडीज अनालिटिक्स या जागतिक स्तरावरील आर्थिक अभ्यासक संस्थेनं  म्हटलं आहे.

 

इंधनांच्या भडकलेल्या दरांमुळे किरकोळ महागाईचा आलेख चढाच राहण्याची चिन्हे असल्याचे व त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करण्यात मर्यादा पडत असल्याचेही मूडीजने नमूद केले आहे.

 

आशियातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातली महागाई हा अपवाद असल्याचेही मूडीजने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये भारतातील किरकोळ महागाईचा दर पाच टक्के इतका वाढला. पतधोरण निश्चित करताना रिझर्व्ह बँक प्रामुख्यानं किरकोळ महागाईचा विचार करते.

 

अन्न, खाद्य पदार्थ, इंधन व वीज यांचा समावेश नसलेला महागाईचा दर जानेवारीच्या ५.३ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ५.६ टक्के इतका वाढला. हा दर असह्य पातळीवर असल्याचे मूडीजने म्हटले आहे. आशियातील बहुतेक देशांमध्ये महागाई नियंत्रणात आहे आणि २०२१ मध्ये ती सावकाश वाढेल असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. कच्च्या इंधन तेलाचे भाव या वर्षी २६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६४ डॉलर्सच्या नजीक पोचले आहेत. तर मार्च २०२० मध्ये हाच भाव प्रति बॅरल अवघा ३० डॉलर्स इतका कमी होता, ज्यावेळी कोरोनाचा प्रश्न ऐरणीवर होता.

 

भारत व फिलिपाइन्स हे दोन देश अपवाद असून या देशांमध्ये महागाईची पातळी सर्वसामान्यांना झेपेल अशा पातळीपेक्षा जास्त असल्याचे निरीक्षण मूडीजने नोंदवले आहे व त्यातही भारतातली महागाई काळजी कारण्यासारखी असल्याची टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला पतधोरण निश्चित करताना, व्याजदरांत कपात करताना मर्यादा येतात. रिझर्व्ह बँकेचं लक्ष्य किरकोळ महागाईचा दर ४ टक्के (कमी अधिक २ टक्के) आहे.

Protected Content