या जालीम ‘जडी-बुटी’ ने मिटेल गरिबी-मोदींची मिश्कील टीका

images 4

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) ‘गरिबी पर वार, बहात्तर हजार’ असा ‘न्याया’चा नारा देत काँग्रेस लोकसभा प्रचाराच्या रिंगणात उतरली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेला ‘गरिबी हटाओ’चा नाराच या योजनेद्वारे राहुल गांधी यांनी दिला आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, असं काही सर्वेक्षणातून दिसून आलंय. हे वातावरण पाहून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज ओडिशातील सभेत गरिबीच्या मुद्द्यावरूनच काँग्रेसवर वार केला. देशातील गरिबी हटवणारी एक जालीम ‘जडी बूटी’ आहे, आणि ती म्हणजे ‘काँग्रेस हटाओ’. काँग्रेसला हटवल्यास गरिबी आटोआप मिटेल, अशी मिश्कील टीका  पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.

 

गेल्या दोन दशकांपासून ओडिशामध्ये कुणाचं सरकार आहे? मी पंतप्रधान व्हायच्या आधी देशात कोणाचं सरकार होतं? या बीजू जनता दल आणि काँग्रेस सरकारची तुम्हाला गरिबीतून बाहेर काढायची इच्छाच नाही. अन्य राज्यांच्या तुलनेत आपण मागे का आहोत, याचा तुम्ही विचार केला आहे का? तुम्हाला गरिबीच्या जोखडातून मुक्त व्हायचं असेल, तर बीजेडी, काँग्रेस सरकार बदलून नव्या दमाचं सरकार आणावं लागेल, असं आवाहन मोदींनी केलं.
देशाला जिंकवण्यासाठी लढतोय!
छत्तीसगडमधील बालोद इथं झालेल्या सभेत पंतप्रधानांनी देशभक्ती आणि शक्तीचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस नेते स्वतःच्या पक्षाला जिंकवण्यासाठी निवडणूक लढत आहेत, पण आम्ही देशाला जिंकवण्यासाठी लढत आहोत. दहशतवादी आणि फुटीतरतावाद्यांना खुली सवलत द्यायची त्यांची इच्छा आहे, पण आम्ही दहशतवादी, फुटीरतवाद्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देऊ इच्छितो, अशी साद मोदींनी घातली.
मजबूत सरकार हवं की लाचार?
काँग्रेस आणि अन्य विरोधकांच्या महाआघाडीचा उल्लेख महामिलावट असा करत, मजबूत सरकार हवं की लाचार सरकार ? असा प्रश्न मोदींनी विचारला. मी यांचा भ्रष्टाचार बंद केला, म्हणून हे सगळे सैरभैर झालेत, पुन्हा भ्रष्टाचार सुरू करण्यासाठी एकत्र आलेत, असा टोला त्यांनी हाणला. मजबूत सरकार दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारते, हे तुम्ही गेल्या वर्षांत पाहिलंय, असंही त्यांनी ठामपणे सांगितले.

Add Comment

Protected Content