भडगाव ( प्रतिनिधी) येथील स्नेह सेवा प्रतिष्ठानतर्फ पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संघाच्या प्रागंणात करण्यात आले होते. पुणे येथील ज्योती गोराणे. श्याम गोराणे, आकाशवाणी कलावंत बापूसाहेब चौधरी या कलाकारांनी विविध भक्तिगीते. भावगीते, गझल, नाट्यगीते सादर करून भडगावकर श्रोत्यांची पहाटे सुरमई केली. सकाळी 5.30 वाजता सुरू झालेली संगीत मैफिल उत्तोरोत्तर रंगत गेली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते जागतिक कीर्तीचा तबला वादक सोहम गोराणे. स्वामी समर्थ मंत्र, भवानी आई, उठ पंढरीचा राजा, प्रभाती सुर नाभि रंगतो, कोटी कोटी रूपे तुझी, प्रभू आले मंदिरो, बगळा ची माळ फुले, उद्धवा अजब तुझे सरकार अशा नानाविध गीतांनी भडगावकर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात किसान संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रताप पाटील, डॉ. ओस्तवाल, मास्टर लाईन्सचे समीर जैन, बाबासाहेब विनय जकातदार, ह.भ.प. मिलिंद महाराज, नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाले, नत्थु अहिरे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. नगरसेविका योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, कालिंदी सहस्रबुद्धे, अनिता भंडारी, सुषमा पवार या भगिनींनी गुढी पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा पाटील व आभार डॉ. दुर्गेश रुळे यांनी मानले.