भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवत आहे ! – शिवसेनेचा टोला

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही…भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनाला आमच्या शुभेच्छा! अशा शब्दांमध्ये आज शिवसेनेने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून यावर भाष्य करतांना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात म्हटले आहे की, दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशभरातले २०० खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतके करूनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी असे चित्र स्पष्ट झाले आहे. केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे. केजरीवाल सरकारच्या त्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हे दिल्ली मॉडेल इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती. आमचे राज्यकर्ते अमेरिका, फ्रान्स, युरोपादी राष्ट्रांतील एखाद्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ते मॉडेल हिंदुस्थानात राबवतील, त्याचा डांगोरा पिटतील, पण दिल्लीतील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या याचे कौतुक करताना त्यांच्या पोटात सर्जिकल स्ट्राइकचा गोळा का उठावा तेच कळत नाही.

या पुढे म्हटले आहे की, पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी जी वचने दिली ती पूर्ण झाली व त्याबद्दल श्री. मोदी किंवा श्री. शहा यांनी केंद्रीय सरकारतर्फे केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारच करून नवा पायंडा पाडायला हवा. पण ते न करता भाजपचे बडे नेते व मंत्री दिल्लीत निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू विरुद्ध मुसलमान असा राजकीय चिखल तुडवीत बसले आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन केले तरीही ते पराभूत झाले. याचा अर्थ असा की, लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्‍न वेगळे आहेत. ते सोडवा. त्यावर बोला. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ङ्गफुलोत्पादनाफला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content