हिंगणघाटच्या पिडीतेला भेटून यशोमती ठाकूरांना अश्रू अनावर

yashomati thakur

नागपूर प्रतिनिधी । हिंगणघाट येथील पिडीत तरूणीची पाहणी केल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एका फेसबुक पोस्टमधून अतिशय भावपूर्ण शब्दांमध्ये या घटनेबाबत भाष्य केले आहे.

यशोमती ठाकूर यांनी गुरूवारी नागपूर येथे उपचार सुरू असणार्‍या तरूणीची भेट घेतली. यानंतर त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्या म्हणतात की, हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पिडीत तरूणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी रूग्णालयात जाऊन आले. तिथून आल्यापासून मी सुन्नच आहे. घरी येऊन मी खूप रडले. डोक्यात असंख्य विचार घुमतायतय. डोळ्यासमोरून पिडीत तरूणीचा चेहरा जात नाही, तिच्या परिवाराशी झांल ते बोलणं अजूनही कानांत घुमतंय. इतकी सुंदर मुलगी, शिकवली नसती, शाळेत पाठवली नसती तर आज लग्न करून नांदत असती. शिकवून चूक केली का? हे तिच्या आईचं वाक्य तर कानात उकळतं तेल ओतल्यासारखंच वाटतं. शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाईंचा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र.. आज अख्ख्या महाराष्ट्राचा पराभव झाल्यासारखं वाटलं. हरल्यासारखं वाटलं.

ना. ठाकूर यांनी पुढे म्हटले आहे की, तमाम आयांना माझं हे ही सांगणं आहे की, मुलींच्या-बायकांच्या वागणं, पेहराव यावरून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, कदाचित आपला मुलगा यातून ही काहीतरी शिकत असेल. मुलांना समजलं पाहिजे की स्त्रीवर अधिकार गाजवणं चुकीचं आहे. हिंगणघाटच्या माझ्या बहिणीचा चेहरा आज माझ्या समोर अनेक प्रश्‍न विचारत उभा आहे. मला स्वतःला अपराधी वाटतंय. माझा समाज तिचं रक्षण करण्यात कमी पडला. अशा घटना या पुढे होणार नाहीत, अशा प्रकारचं कृत्य करायला एखादा माथेफिरू धजावणार नाही असा समाज निर्माण होत नाही तोपर्यंत मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू शकणार नाही.

खाली पहा ना. यशोमती ठाकूर यांची फेसबुक पोस्ट.

Protected Content