भाजप आमदार राजूमामा भोळे आणि महापौरांसह 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) जमावबंदी व साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह 22 जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

बुधवारी कोरोना रुग्णालयातील वॉर्ड क्र.७ मधील स्वच्छतागृहात कोरोनाबाधित मालती नेहते या बेपत्ता वृध्देचा मृतदेह आढळून आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. याच घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार राजूमामा भोळे व महापौर भारतीताई सोनवणे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आंदोलन केले होते. यावेळी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांचे दालन गाठून निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक फौजदार भटू नेरकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार आमदार राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भाजप गटनेते भगत बालाणी, अरविंद देशमुख, मनोज आहुजा, माजी नगरसेवक अतुल हाडा, नगरसेवक सुनील खडके, पिंताबर भावसार व इतर ८ ते १० जणांविरुध्द जमावबंदी आदेश उल्लंघन, भादवि कलम १८८, १४३,२६९ अन्वये तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब व साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ व ४ व ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content