भाजपने तृणमूल आमदार फोडला

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यांच्या आणखी एका आमदाराने तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शांतीपूर विधानसभा मतदारसंघाचे तृणमूलचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अरिंदम भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत दिल्लीत कमळ हाती घेणार आहेत.

अरिंदम भट्टाचार्य हे २०१६ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र त्यानंतर वर्षभरातच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

 

ममतांच्या मंत्रिमंडळातील बडा चेहरा असलेले शुभेंदु अधिकारी हे गेल्या महिन्यातच भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यांच्यासोबत जवळपास अर्धा डझन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ज्या नंदीग्राममध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भगदाड पाडलं त्याच ठिकाणी ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी २०१६ मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह १० आमदारांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे आहे. तृणमूलमधील हे आजवरचे सर्वात मोठं बंड असल्याचं मानलं जात होतं.

खासदार, माजी खासदार आणि आमदारही पक्षाला सोडून गेल्याने नंदीग्राममध्ये तृणमूलच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्रामवर भाजपचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून भाजपच्या खेळीला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपमध्ये डेरेदाखल झाल्यानंतर सुवेंदु अधिकारी यांनी थेट ममतांना शिंगावर घेतलं आहे. ममतांनी नंदीग्राम आणि त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, सुवेंदु अधिकारींनी त्याला विरोध केला आहे. ममतांना दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आमचा विरोध असेल असं सुवेंदु अधिकारी म्हणाले. नंदीग्राम हा सुवेंदु अधिकारी यांचा गड मानला जातो. ते याच मतदारसंघातून निवडून आले होते.

Protected Content