भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार

 

जळगाव :   प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे  याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.

 

जळगाव महापालीकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यात बहुमत असतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्र ठरविण्यात कारवाई करावी यासाठी भाजपतर्फे आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची आहे. जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या सोबत महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील, तसेच पक्षाचे वकील अॅड. भगत, अॅड. मेढे पाटील उपस्थित होते.

 

या बाबत पक्षाचे महापालिकेतील गटनेते बालाणी यांनी सांगितले, पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबत ही याचिका आहे. या सोबत संपूर्ण पुरावे जोडण्यात आले आहेत. यात नगरसेवकांना घरी जाऊन बजावला गेलेला व्हिप, जाहीर व्हिप, नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान, असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Protected Content