नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्र सरकार फक्त लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या टीकेला महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे शरद पवार यानी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. मी कृषीमंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते हे खरे आहे. एपीएमसी कायदा देशात राहिला पाहिजे, मात्र त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मात्र केंद्र सरकारचे नव्या तीन कायद्यांमध्ये एपीएमसीचा उल्लेखच नाही, असे सांगत पवार यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे.
शरद पवार यांनी लिहिले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो धागा पकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला पवार यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘जेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते केव्हा त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना बाजाराच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी करण्याबाबत पत्र लिहिले होते. बाजार कायद्यात बदल करणे आवश्यक आहे असे त्यावेळी शरद पवार म्हणत होते. यात खासगी क्षेत्राला आणणे गरजेचे आहे, असे पवार म्हणत होते. शेतकऱ्यांना आपले उत्पादन कोठेही विकण्याची संधी मिळायला हवी, असे शरद पवार म्हणाले होते.’
आज आम्ही जे काम करत आहोत, ते काम डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार करत होते. २००५ मध्ये शरद पवार हेच बोलत होते. जर तुम्ही कायद्यात सुधारणा केली नाही, तर आम्ही वित्तीय समर्थन देणार नाही, असे शरद पवार म्हणत होते आणि त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारचे समर्थन समाजवादी पक्ष, आरजेडी, सीपीआय आणि इतर पक्ष करत होते, असे रविशंकर प्रसाद यांनी शरद पवारांसह यूपीए सरकार आणि अन्य पक्षांवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे.