भारतीय किसान संघाला हव्यात नव्या कृषी कायद्यात सुधारणा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रानं नव्यानं लागू केलेल्या कृषी कायद्यात काही सुधारणा आवश्यक असल्याचं मत राष्त्री स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाकडून व्यक्त करण्यात आलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघ ही संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेली नाही. शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला नसला तरी शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या चुकीच्या असल्याचंही या संघटनेचं म्हणणं नाही.

केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांकडून आवाहन करण्यात आलेल्या ‘भारत बंद’चं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु, कृषी कायद्यांत काही सुधारणा आवश्यक आहे, असं भारतीय किसान संघाकडून सांगण्यात येतंय.

भारतीय किसान संघाचे नेते महेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही भारत बंदचं समर्थन करणार नाही. परंतु, आम्ही या तीन कायद्यांच्या या रुपाचंही समर्थन करणार नाही. आम्हाला या कायद्यात काही सुधारणेची अपेक्षा आहे. यासाठी आम्ही ऑगस्ट महिन्यातच केंद्राला एक पत्रंही लिहिलंय. ज्यात गावांतून मिळालेल्या सूचनेनुसार, एम एस पी अर्थात किमान हमीभाव खरेदीची सुविधा देण्याची शिफारस करण्यात आलीय. या सूचनेवर विचार करण्यात येईल असं आश्वासन अगोदरच केंद्राकडून देण्यात आलंय’.

‘एक बाजार एक देशसहीत अनेक तरतुदींचं आम्ही समर्थन करत आहोत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो’ असंही भारतीय किसान संघाचं म्हणणं आहे.

कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्ली या राज्यांत हा बंद मोठ्या प्रमाणावर पाळण्यात येतोय. आज सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत भारतभर हा बंद पाळला जाणार आहे.

Protected Content