भाजपचे आता तिरंगा रॅलीचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये तिरंगा फडवण्याची घोषणा केली असून यासाठी विशेष झेंडा रॅली काढण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरुन आणि लाल किल्ल्यामध्ये झालेल्या गोंधळावरुन सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये अनेक ठिकाणी हिंसा झाली ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आला. सोशल नेटवर्किंगवरही यासंदर्भातील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झालेत. अशाच एका व्हिडीओमध्ये लाल किल्ल्यावरील तिरंगाच्या खाली असणाऱ्या अन्य एका ध्वजस्तंभावर काही तरुणांनी पिवळ्या रंगाचा त्रिकोणी झेंडा फडकवल्याचेही दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरुन झेंडा रॅलीची घोषणा केलीय. “तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान. तिरंगा मार्च ३० जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून हा मोर्चा सुरु होईल. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या मोर्चामध्ये नक्की सहभागी व्हा,” असं शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या आंदोलनामध्ये धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकऱणी बोलताना त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेला अभिनेता दीप सिद्धूने मंगळवारी आंदोलनांचे समर्थन करताना, लाल किल्ल्यावरील तिरंगा झेंडा हटवण्यात आला नाही असं म्हटलं आहे. फडकवण्यात आलेला झेंडा हा प्रतिकात्मक होता. आपला विरोध दर्शवण्यासाठी ‘निशाण साहिब’चा झेंडा झळकवण्यात आला, असं सिद्धूने स्पष्ट केलं आहे. ‘निशाण साहिब’ हा झेंडा शीख धर्मियांसाठी पवित्र मानला जातो. हा झेंडा सामान्यपणे गुरुद्वारांमध्ये लावला जातो.

सिद्धूने फेसबुकवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेल्या प्रकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घडलेला प्रकार हा नियोजित नसून याला कोणताही संप्रदायिक रंग देण्यात येऊ नये, मात्र कट्टरतावाद्यांकडून तसा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी कायद्यांना प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी आम्ही ‘निशाण साहिब’ आणि शेतकरी आंदोलनाचा झेंडा फडकावत किसान मजदूर एकतेच्या घोषणाही दिल्या, असं सिद्धू म्हणाला आहे. ‘निशाण साहिब’चा झेंडा विविधतेमध्ये एकतेचं प्रतिनिधीत्व करतो. लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वज हटवण्यात आला नाही किंवा देशाच्या एकतेवर किंवा अखंडतेवर प्रश्नचिन्ह कोणत्याही आंदोलकाने उपस्थित केलं नाही, असंही सिद्धूने या व्हिडीओत म्हटलं आहे.

Protected Content