
भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला क्रिकेट समर कॅम्प १ मे ते २ जून या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. क्रिकेट प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे हा कॅम्प विशेष ठरला.

कॅम्पच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंना क्रिकेटचे तांत्रिक प्रशिक्षण, फिटनेस सत्रे आणि सराव सामने यांचे मार्गदर्शन करण्यात आले. खेळातील कौशल्य वृद्धीसोबतच खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून योगा, प्राणायाम आणि मड थेरपीसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सामाजिक बांधिलकी जपत अकॅडमीतर्फे इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भडगाव शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याचबरोबर जनगणना जनजागृतीसाठी पायी रॅली काढून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संगीत विषयावरील विशेष सत्र आयोजित करण्यात आले. तसेच फिटनेस, आरोग्य आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस कर्मचारी हरीश परदेशी आणि उमेश भोई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. योगेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली. संगीत क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रशांत सोळंके आणि नीरज खैरनार यांनी विशेष मार्गदर्शन केले.
१ जून रोजी खेळाडूंसाठी डीएम वॉटरपार्क येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला. महिनाभराच्या प्रशिक्षण आणि उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या क्रिकेट कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाली असून त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याचे दिसून आले.
कॅम्पचा समारोप २ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या कार्यक्रमाला पाचोरा शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, विनय जकातदार, विजय देशपांडे, डॉ. विजय देशमुख, डॉ. प्रमोददादा पाटील, डॉ. निलेशदादा पाटील, हाजी झाकिर कुरेशी, सौरभभाऊ पाटील, प्राचार्य डॉ. गायकवाड, पत्रकार संजय पवार, प्रा. दीपक मराठे, प्रा. अतुल देशमुख, योगेश शिंपी यांच्यासह पालक, माजी खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पीएसआय योगेश जाधव तसेच जळगाव पोलीस दलातील विलास शिंपी आणि रविआबा येवले यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भडगाव क्रिकेट अकॅडमीचे संचालक रवींद्र वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा समर कॅम्प यशस्वीपणे पार पडला. कॅम्पच्या आयोजनात परीक्षित पाटील, चेतन खैरनार, प्रशांत सोळंके आणि नीरज खैरनार यांनीही मोलाचे योगदान दिले.



