Home प्रशासन रावेरमध्ये अन्न सुरक्षा तपासण्यांचा अभाव; नागरिकांकडून कारवाईची मागणी

रावेरमध्ये अन्न सुरक्षा तपासण्यांचा अभाव; नागरिकांकडून कारवाईची मागणी

0
15


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासण्यांचे प्रमाण अपुरे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, किराणा दुकाने, मॉल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री केंद्रांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा सध्या शहर आणि ग्रामीण भागात सुरू आहे. विशेषतः मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर तालुक्यात बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील काही भागांमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असून अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. काही किराणा दुकाने व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याच्या तक्रारीदेखील समोर येत आहेत. त्यामुळे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्यांची साठवणूक पद्धत आणि वैधता यांची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

रावेर तालुका मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर बाहेरील भागातून येतात. या वस्तूंची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार त्यांची तपासणी होत आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रभावी कारवाईसाठी ओळख असलेले वरिष्ठ अधिकारी कार्यरत असल्याने अन्न सुरक्षेच्या बाबतीत अधिक कठोर उपाययोजना होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने रावेर शहरासह ग्रामीण भागात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नफेखोरीच्या स्पर्धेत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी, नियमित तपासण्या आणि दोषींवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रावेर तालुक्यात अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय होऊन नागरिकांचा विश्वास संपादन करेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound