ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याविरोधात कारवाईवर भाजप नेत्यांचा आक्षेप

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ब्रुक फार्म कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या कारवाईवर भाजप नेत्यांननी आक्षेप घेत हे राज्य सरकारचे राजकारण दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे 

 

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असून यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे.रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं  कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारला

 

 

पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि भाजपा नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले   त्यांनी ब्रुक फार्माविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर अखेर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलं. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि कारवाई केली जाते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला

 

“महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार  दुर्दैवी आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटलं आहे.

 

 

“एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही  ” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली

 

 

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रुक फार्मा कंपनीत जाऊन रेमडेसिवीरसाठी विनंती केली त्यांनी परवानगी दिली तर आमचा सगळा साठा महाराष्ट्राला देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. मी केंद्रीय मंत्र्यांशी परवानगीसंदर्भात चर्चा केली. एफडीएकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या. दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. फडणवीस आणि दरेकरांच्या म्हणण्यावर तुम्ही इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी विचारला. रात्री १० वाजता पोलीस घरी गेले आणि त्यांना उचलून घेऊन आले. आम्ही रेमडेसिवीर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना राजकारण सुरु आहे. आम्ही महाराष्ट्राला मदत करण्यासाठी काम करत असून, फक्त आम्ही करत आहोत म्हणून त्रास दिला जात असेल तर योग्य नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

 

राज्यात सध्या रेमडेसिवीरची कमतरता असून त्याचा मोठा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत.अनेकांनी त्याचा साठा केल्याच्याही तक्रारी आहेत. निर्यातबंदी झाली असून काही जणांकडे मोठ्या प्रमाणात याचा साठा आहे आणि ते निर्यात करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. एफडीएच्या मदतीने आम्ही त्याची चाचपणी करत होतो. चौकशीसाठी आम्ही बोलावलं होतं आणि त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

१२ एप्रिलला भाजपा नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले होते.

Protected Content