नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे ब्रिटनला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती आणखी काही काळ लांबू शकते, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीदिली.
या मंत्रालयाच्यावतीने देशात लसीच्या वाहतुकीबाबतही माहिती देण्यात आली. हरदीपसिंग पुरी म्हणाले, “मला वाटतं की ब्रिटनला जाणाऱ्या विमानांच्या या तात्पुरत्या बंदीत आणखी वाढ होऊ शकते. मात्र, खूप काळासाठी ही बंदी सुरु राहिलं असं मात्र मला वाटत नाही.”
कोरोना प्रतिबंधक लसीच्या वाहतुकीबाबत एअर इंडियाच्या वापराबाबत नागरी हवाई उड्डान मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला म्हणाले, ” कोरोना लसीच्या वाहतुकीबाबत आजवर आमच्यासमोर अनेकांनी रस दाखवला या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात मात्र बोली लावणाऱ्यांना या प्रस्तावावर स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे.”
लसीच्या वाहतुकीबाबत मंत्रालयानं म्हटलं की, “या कामासाठी एअरलाइन्ससहीत सर्व भागधारकांना अलर्ट करण्यात आलं आहे. लसीबाबत संपूर्ण विवरण जाणून घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि फार्मा विभाग यासाठी मानक संचलन प्रक्रिया तयार करणार आहेत. यासाठी विस्तृतपणे एसओपी जाहीर केल्या जातील.”
नवा विषाणू समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाची माहिती शेअर केली आहे. मंत्रालयाने म्हटलं की, “सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशी जे गेल्या १४ दिवसांत भारतात आले आहेत. ज्यांच्यामध्ये लक्षणं आढळून आली असतील आणि त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना जिनोम सिक्वेंसिंगमध्ये समाविष्ट केलं जाईल.”
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं की, कोविड-१९ लसीकरणाचा अभ्यास तीन राज्यांमध्ये यशस्वीपणे पार पडला आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये ड्रायरनचे आयोजन करण्यात आले होते.