ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज ऑफलाइन भरण्याची आयोगाची मान्यता

 

पाचोरा, प्रतिनिधी । ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देश होते. मात्र, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांना ऑफलाइन अर्ज भरण्याची मान्यता दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपाचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल तारीख २८ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत नमूद केले होते की, विद्यमान ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना निवडणूक आयोगाच्या पोर्टलची गती कमी असणे, वारंवार म्हणजे चुका येणे, पोर्टलवर ट्रॅफिक जास्त झाल्याने ते थंड पडणे व एकच उमेदवारी अर्ज वारंवार भरावा लागत असल्याने वेळेचा अपव्यय होणे यासह अनेकविध तक्रारी निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे केली होती. संगणक प्रणालीच्या वाढत्या अडचणीमुळे अनेक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहणार असल्याचा धोका अमोल शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला होता.

अमोल शिंदे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत २९ रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सुधारित आदेश पारित केले. या नवीन आदेशानुसार राज्यातील इच्छुक ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज भरतांना संगणक प्रणाली ऐवजी पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास मान्यता दिली आहे. त्यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. माहे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या १४२३४ ग्रामपंचायतींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो कारभारिंना दिलासा मिळाला असून त्यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

Protected Content