बलात्कारातील दोषींना नपुंसक करणार

अबुजा वृत्तसंस्था । वाढत्या बलात्काराच्या घटनां रोखण्यासाठी आता बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. १४ वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अनेक देशांमध्ये महिलांविरोधात अत्याचार वाढत असताना या सरकारने घेतलेल्या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा होत आहे.

नायजेरियातही या घटना वाढत असल्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. कदुना प्रातांत लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी सांगितले की, गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

देशात वाढत असलेल्या बलात्कारामुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार आहे. एखाद्या महिलेनेदेखील १४ वर्षाखालील मुलावर बलात्कार केल्यास त्या महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे. १४ वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. देशात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना पाहता महिला संघटनांनी बलात्काऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. लोकांच्या संतापाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात अल्पवयीन मुलांवर महिलांकडून होणाऱ्या अत्याचाराचा समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये परदेशी महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा डागाळली गेली. पाकिस्तानमध्येही या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरून महिलांनी संतप्त निदर्शने केली. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काऱ्यांना जाहीरपणे फाशी द्यावी अथवा नपुंसक करावे असे वक्तव्य केले आहे. इम्रान खान यांनी महिलांविरोधात लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचे एक राष्ट्रीयपातळीवरील नोंदवही तयार करण्यास सांगितले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यास इतरही धजावणार नाहीत.

Protected Content