चुंचाळे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावातील प्रमुख मार्गावर घाणीचे साम्राज्य

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे गावातील नायगाव रोडवरील ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात उकिरडे व नागरीकांच्या उघडयावर शौचामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे  नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ग्राम पंचायत सरपंच व ग्रामसेवकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे ही समस्या सुटत नसल्याची ग्रामस्थांची ओरड असून काही भगिनींनी या संदर्भात ग्रामसेवक यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात गावातील महिलांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, “चुंचाळे गाव ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील चुंचाळे ते नायगाव या मार्गावरील रस्त्यावरील रहीवासी नागरीकांच्या घरासमोर गावातील लोकांनी उकिरडे केले आहेत. या परिसरात महीलांसाठीचे स्वच्छतागृह असून या स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्यात येत नसल्याने पर्यायी महीला भगिनींना रस्त्याच्या कडेलाच उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात अशा प्रकारच्या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

याबाबत याआधी महिलांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केलेल्या असून या नागरीकांच्या आरोग्यास निगडीत तक्रारीस ग्रामपंचायत कोणतेही महत्व देत नसल्याने ग्रामपंचायतच्या या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या निष्क्रियता आणि उदासिनतेमुळे गावात शासकीय योजनांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत कोणतेही विकास कार्य झालेले नसून या आधीच्या मिळालेल्या निधीत मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी तक्रार अर्जात नमूद केला आहे.           

चुंचाळे ग्रामपंचायत अंतर्गत निर्माण झालेल्या घाणीमुळे व यातून पसरलेल्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून या प्रकारातून उद्भवणाऱ्या प्रश्नावरून साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास सरपंच आणि ग्रामसेवक हे संपूर्ण यास जबाबदार राहणार असल्याचे ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे. यावर सुमय्या मुबारक तडवी, सयनाज अरमान तडवी, जयतुनबाई नबाब तडवी, रहेमतबाई गुलाब तडवी, मुबारक नबाब तडवी, अरमान राजेन्द्र तडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content