बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातील कॅमेरा आणि बोकड चोरून नेले !

 

 

अहमदनगर: वृत्तसंस्था । वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यातून मोशन कॅमेरे आणि बोकड चोरीची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भागात वन विभागाची पथके कार्यरत झाली असून ड्रोनद्वारेही शोध सुरू आहे. पिंजऱ्यात येत नसल्याने डार्ट मारून त्याला पकडण्याचीही तयारी करण्यात आली आहे. मात्र, विस्तीर्ण डोंगर दऱ्या, जंगल, शेतातील पिके यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या भागास भेट दिली. दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी त्या भागात ठाण मांडून आहेत. पाथर्डी वन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बिबट्याचा अनुभव नाही. त्यांच्याकडे यंत्रणाही नाही. त्यामुळे बाहेरून पथके बोलाविण्यात आली आहेत. जळगाव येथील पथक दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातूनही पथके बोलाविण्यात आली आहेत. ज्या भागात बिबट्याचा वावर आढळून आला, तेथे सुमारे पिंजरे लावण्यात आले आहेत. अद्याप तो पिंजऱ्याकडे फिरकला नाही.

अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळण्यात येऊ लागले आहे. शेतीवर जाणाऱ्यांची, व्यावसायिकांची मात्र अडचण होत आहे. यात अफवांनाही ऊत आला आहे. अनेक जुने आणि दुसऱ्या भागातील व्हिडिओ व्हायरल करून बिबट्या दिसल्याची खोटी माहितीही प्रसारित केली जात आहे. वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्याचेही प्रकार होत आहेत.

. आमदार मोनिका राजळे यांनही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे

Protected Content