यावल तालुक्यात पावसाची दमदार हजेरी ; धरणे मात्र रितीच

dd60d98b 55e3 4c40 b7ae a0c0e174c7a6

यावल, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, पाऊसाच्या या दमदार हजेरीमुळे पिकांची स्थिती ही समाधानकारक असली तरी मात्र अद्याप कुठल्याही नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावणारी सगळी धरणे कोरडी असल्याने शेतकऱ्यांमध्ये पाऊस येवुन सुद्धा भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

 

या करीता आगामी काळात जोरदार पावसाची अजूनही शेतकरी बांधवांना फार मोठी अपेक्षा आहे. तालुक्यातील सातपुडा पर्वतावर चांगला पाऊस होऊनही धरणे अद्यापही भरलेली नाहीत. मागील वर्षापासुन नदी-नाल्यांना पूरच आल्याचे पहावयास मिळालेले नाही. सद्यस्थितीला होणारा पाऊस हा फक्त जमिनीतच झिरपत आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पाणी येत नाही. याच कारणामुळे धरणे १००% भरलीच नाहीत, परिणामी विहीरींतील पाण्याची पातळी फार मोठ्या प्रमाणात खोल गेलेली असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. यावर्षी तर शेतकरी बांधवांनी आपल्या केळी बागाही उपटून फेकून दिल्या आहेत व ऊस मागून पेरले आहेत म्हणून यावर्षी खरिपाचा पेरा सर्वाधिक आहे तर ओलिताखाली येणाऱ्या जमीनीचा पेरा हा अत्यल्प उरला आहे. पाऊस येत असला तरी केळी लागवड व ऊस लागवड फार कमी प्रमाणात होणार असल्याचे यंदा चित्र आहे. त्यातच तालुक्यातील बऱ्याच गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिक मशागत पूर्णत्वास आलेली आहे. पावसाची फार मोठी अपेक्षा होती, ती येणाऱ्या काळात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. परंतु नदी-नाल्यांना पूर येणे फार गरजेचे आहे. तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेली निंबा देवी धरण, हरिपुरा धरण, मनुदेवी धरण, वरील धरण ही रितीच आहेत. तालुक्यात दिनांक २९ जुलैपर्यंत सरासरी ४२.८८ मि.मि पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधीक पावसाची नोंद फैजपुर येथे ६८.०७ मि.मी. एवढी झाली असून साकळी येथे ४५.०९ मि.मि., किनगाव येथे ४१.०३ मि.मि., भालोद येथे ४१.०८ तर बामणोद ४५.०४ मिली मिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content