संचारबंदी : स्लोगनद्वारे शेंदुर्णी नगरपंचायतीचे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

शेंदूर्णी, प्रतिनिधी। राज्य व केंद्र सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करत असतांना नागरिकांना घरातच राहण्यासाठी आवाहन करत आहे. यानुसार शेंदुर्णी नगरपंचायतीकडून नागरिकांनी घरातच राहावे विना कारण घराबाहेर फिरू नये असे लाऊड स्पीकरवरून गल्लोगल्ली रिक्षा फिरवून आवाहन करण्यात येत असले तरी नागरिक ऐकत नसल्याने विविध चौकात कोरोनासंदर्भातील स्लोगन लिहून जनजागृती करण्यात येत आहे.

नगराध्यक्षा विजया खलसे व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आता जनजागृतीसाठी स्लोगनचा आधार घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार येथील बसस्थानक परिसरात, स्टेशन रोडवरील फळविक्री संस्थेच्या शॉपिंग सेंटर समोर, वाडी दर्जा भागातील मारोती मंदिराजवळ स्लोगन लिहून त्याद्वारे नागरिकांना प्रश्न विचारून कोरोनासंदर्भात जनजागृतीचा नवा फंडा अवलंबिला आहे . शेंदूर्णी नगरपंचायत गावातील धूर फवारणी,सोडीयम हायपलोक्लाराईड फवारणी, सुरक्षित अंतरावर दुकानांसमोर चौकोन आखणी आता स्लोगन लिहिणे याद्वारे नागरिकांची काळजी घेत आहे. त्याला नागरीकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही नगराध्यक्षा विजया खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांचेकडून करण्यात आले आहे. सद्या विविध चौकात खालील स्लोगन लिहून जनजागृती करण्यात येत आहे. “आपण खरंच कामासाठी घरा बाहेर पडताय का ? विना कारण फिरत असाल तर, कुटुंब व शहराला धोक्यात आणत आहात. घरात राहूया कोरोना टाळूया” असे आवाहन करून कवटीचे धोका दाखवणारे चित्रही स्लोगन सोबत रेखाटण्यात आलं आहे. त्यासाठी नगरपंचायत कर्मचारी कलीम शेख,सुनील निकम,नमन निकम हे कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करीत आहेत

Protected Content