फैजपूरातील खंडोबा यात्रा हे खानदेशचे वैभव – ना. गुलाबराव पाटील

फैजपूर प्रतिनिधी । ऐतिहासिक, अध्यात्मिक ज्ञान पंढरी म्हणून सुपरिचित असलेल्या फैजपूर नगरीत गेल्या २१५ वर्षापासून अविरतपणे प्रति जेजुरी श्री. खंडोबा महाराज यांचा यात्रोत्सव यज्ञ सुरू आहे. खंडोबा यात्रा म्हणजे खानदेशचे वैभव आहे. राज्य व राष्ट्रीयस्तरावरील भक्त गणांसाठी एक पर्वणीच असते, असे गौरवोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी फैजपूर येथे काढले.

श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूरच्या श्री खंडोबा महापुजा भंडारा, (उधळण) वस्त्र-अस्त्र-शस्त्र अर्पण सोहळा व व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी तर प्रमुख पाहुणे खा. रक्षाताई खडसे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, पुणे मनपा विरोधीपक्ष नेता नामदेव ढाके, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, नगराध्यक्ष महानंदा टेकाम (होले), जि.प.गटनेता प्रभाकर सोनवणे, मसाका चेअरमन शरद महाजन, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार जितेंद्र कुवर, सपोनि प्रकाश वानखेडे, मध्यरेल्वे अभियंता मुन्नासिंग तोमर यांची उपस्थिती होती.

संताची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला संत परंपरेतील श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्रीरामसनई दास जी महाराज, मोठे लक्ष्मीनारायण मंदिर नासिक, महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज सतपंथ मंदिर संस्थान फैजपूर, श्रद्धेय परमपूज्य गोपाल चैतन्य जी महाराज, परमपूज्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दासजी अध्यक्ष श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदा, महंत भरतजी महाराज श्रीराम मंदिर निर्मोही आखाडा कुसुंबा, परमपूज्य स्वरूपानंद स्वामी श्री पंत मंदिर डोंगरदे, शास्त्री जगत प्रकाश दाजी महाराज श्री हनुमान मंदिर सुनासावखेडा, श्री कन्हैयादासजी महाराज, श्री राम मंदिर चिनावल, अद्वैतानंद सरस्वती महाराज कानळदा, महंत महात्यागी एकनाथदाजी महाराज, महंत सुरेशराज शास्त्री, श्री दत्त मंदिर सावदा, परमपूज्य कृष्ण गिरीजी महाराज, सोमवारगिरीमढि सावदा, परमपूज्य दिगंबर शास्त्री श्री शनी मंदिर वाघोदा, शकुंतला दीदी प्रजापिता ब्रह्मकुमारी सावदा, आदि संत महात्म्य उपस्थित होते.

या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान रविंद्र वायकोळे, जितेंद्र वायकोळे यांना होता. या कार्यक्रमाप्रसंगी वस्त्र अर्पण सोहळा खा. रक्षाताई खडसे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी त्यांनी संत निवासाची व्यवस्था करून देण्याची घोषणा केली. यासोबत वस्त्र शस्त्र अर्पण सोहळा माजी आ. हरिभाऊ जावळे यांच्या शुभहस्ते पार पडला तर वस्त्र अर्पण सोहळा नामदेवराव ढाके यांच्याहस्ते पार पडला.

श्री खंडोबा महाराज महापूजा ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. शिरीष मधुकर चौधरी हे होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री श्री 1008 महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास जी महाराज यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की, श्री खंडोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सवाला एक उज्वल परंपरा असून परिसरातील सर्व भक्तगण, संत- महात्म्य व मान्यवरांचे सहकार्य यात्रा उत्सवाला यशस्वी करण्यासाठी मिळत आलेले आहे. यावर्षी नवीनच यात्रोत्सव शुभारंभ आयोजनाची कल्पना पार पडत असून यानिमित्त खानदेशचे वैभव असलेले श्री खंडोबा महाराज देवस्थान प्रति जेजुरी म्हणून विकसित व्हावे व या माध्यमातून परिसराचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांना अभिवचन दिले. यावेळी परमपूज्य स्वामी भक्ती प्रकाशदाजी यांनी आयोजनाचे कौतुक करीत फैजपूरला लाभलेल्या वैभव शाली यात्रोत्सव परंपरेला अधिकाधिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी हरिभाऊ जावळे यांनी समाज व देशाच्या विकासासाठी सर्व स्तरातील सर्वधर्मीय व सर्व पंथीय लोकांनी एकत्र येऊन विकासाला हातभार लावावा आणि याची सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकर चौधरी यांनी श्री खंडोबा वाडी देवस्थान अतिप्राचीन व असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असल्याने या देवस्थानाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात बोलताना ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगित त्यांचे मामा स्वतः महामंडलेश्वर असल्याचे सांगून फैजपुरच्या खंडोबा वाडी देवस्थानला 25 लाखाचा विकास निधी जाहीर करून देशात या देवस्थानाला नावारुपाला आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले तर अनमोल सहकार्य समस्त भक्तगण, श्री खंडोबा वाडी संस्थान फैजपूर यांनी केले.

Protected Content