मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आगामी काळात पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.