पैसे थकवल्याने मलेशियाकडून पाकिस्तानचे प्रवासी विमान जप्त !

 

कुआलालंपूर (मलेशिया) : वृत्तसंस्था । पाकिस्तानचा पुन्हा एकदा इज्जतीचा फालूदा झाला आहे. पैसा थकवल्याने मित्रदेश मलेशियाने पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलायन्सचं बोईंग विमान जप्त केलं आहे.

खरंतर पाकिस्तानने बोईंग विमानाचं भाडं चुकवलं नव्हतं. मलेशियाच्या स्थानिक कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे

पाकिस्तानच्या कराची विमानतळावरुन बोईंग- ७७७ हे विमान कुआलालंपुर विमानतळावर आलं होतं. हे विमान परत पाकिस्तानच्या दिशेला उड्डाण करणार होतं. उड्डाणाची पूर्ण तयारी झाली होती. सर्व प्रवाशी विमानात बसले आणि विमानाचा सर्व स्टाफ सज्ज देखील झाला. मात्र, अचानक मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी विमान थांबवलं. त्यांनी सर्व स्टाफ आणि प्रवाशांना विमानातून खाली उतरवलं. त्यानंतर विमान जप्त करण्यात आलं. विमान जप्त केल्याने विमानातील १८ कर्मचारी देखील कुआलालंपुर येथे अडकले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार १४ दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे

पाकिस्तानच्या नाचक्कीची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अनेकवेळा पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. काही दिवसांपूर्वी कराचीत एका विमानाचा अपघात झाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी केलेल्या दाव्यावर संपूर्ण जग हसलं होतं. पीआएमधील ४० टक्के पायलट हे बनावट परवानाधारक असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी केलं होतं.

याआधी सौदी अरेबियानेदेखील पाकिस्तानला मोठा झटका दिला होता. पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेवर सौदी अरिबियाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला २०१८ मध्ये दिलेली ३ मिलियन डॉलरची आर्थिक मदत परत मागितली होती. त्यानंतर पाकिस्तानने चीनकडून कर्ज काढून सौदी अरेबियाला पैसे परत केले होते.

Protected Content