पुणे वृत्तसंस्था । पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या १७ कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्व कामगार येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमधील आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पुण्यातील अनेक कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुणे मेट्रोचे केवळ २० ते ३० टक्के काम सुरु आहे. याच मेट्रोचे काम करणाऱ्या एका ठेकदाराकडील १७ कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्वजण येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमध्ये राहतात.
या कॅम्पमधील ६९ कामगार मेट्रोचे काम करतात. त्यातील १७ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मेट्रो कामादरम्यान नियमित तपासणी सुरु असताना ही बाधा झाल्याचे स्पष्ट झालं आहे. तर उर्वरित ४९ कामगारांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान सध्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये 88 कामगार काम करत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य त्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आणखी दक्षता घेतली जाणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे.