लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार द्या — अण्णा हजारे

 

नगर: वृत्तसंस्था । आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी,’ असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे.

‘कोणतेही सरकार फक्त आंदोलनांना घाबरत नाही, तर पडण्याला घाबरते. आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. असेही ते म्हणाले
संविधान दिनाच्या निमित्तानं हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला असून लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार देण्याची मागणी केली आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकविणारी शक्ती उभी करा, असं आवाहन त्यांनी यातून केलं आहे.

हजारे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरीही खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. आपल्या देशातील पक्ष आणि पार्टी पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा आणि शहरात वॉर्डसभा अशी रचना करणारा कायदा करा, अशी आमची मागणी आहे. मात्र, पक्ष आणि पार्टीवर चालणाऱ्या आपल्या सरकारला लोकांना अधिकार देणारी अशी रचना नको आहे. त्यामुळं आतापर्यंत यासंबंधी कोणत्याच सरकारनं हालचाल केली नाही. सरकारी तिजोरी ही जनतेची आहे. त्यातील व्यवहार पारदर्शक पद्धतीनंच झाले पाहिजेत. गावातील सार्वजनिक संपत्तीचे गाव मालक आहे. ग्रामसभेच्या निर्णयाशिवाय त्यासंबंधी निर्णय होता कामा नयेत. जनता मालक आहे आणि सरकारमधील लोक सेवक आहेत तर या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल.’

‘ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्थतीनं आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतरही अशी आंदोलने अनेक कायदे मंजूर करून घेण्यात यश आलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या लोकशाहीसाठी लढा द्यायचा आहे. त्यासाठी सरकारला पडण्याची भीती वाटू शकेल, अशी शक्ती उभी करण्याची गरज आहे. सरकार बदलण्याची चावी मतदारांच्या हातात असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा ऐकत नसेल तर मतदारांनी अशा पक्ष व पार्टीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. हे मोठे हत्यार मतदार विसरले आहेत. त्यांना याची पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे. ग्रामसभा ही लोकशाहीत महत्त्वाची आहे, हे लोकांना पटवून देऊन जागृत करण्याची गरज आहे. लोकपालच्या मागणीच्यावेळी जनता जशी जागृत झाली होती, तसे आता पुन्हा झाल्यास लोकशाही मजबूत करणारा कायदा होऊ शकेल,’ असंही हजारे म्हणाले.

Protected Content