पारंपरिक उपचार पद्धतीच्या जागतिक केंद्राची निर्मिती करण्यासाठी भारताची निवड

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक उपचार पद्धतीचे जागतिक केंद्राची निर्मिती करण्यासाठी भारताची निवड केली आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी पाचव्या आयुर्वेदिक दिनानिमित्त बोलताना आयुर्वेद हा भारताचा वारसा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे तर, जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. भारतात कोरोना स्थिती नियंत्रणात पारंपरिक उपचार पद्धतीचे मोठे योगदान आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आज ब्राझील देशाच्या राष्ट्रीय धोरणात आयुर्वेदाचा समावेश आहे. भारत-अमेरिका असोत किंवा मग भारत-जर्मनी यांचे संबंध असोत, आयुष आणि पारंपरिक उपचार पद्धतीशी जोडलेले सहकार्य सतत वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जेव्हा कोणताही प्रभावी मार्ग उपलब्ध नव्हता, तेव्हा भारतातील घरा-घरात हळद, काढा, दूध कामी आले. इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या आमच्या देशात कोरोना नियंत्रणात राहण्याचे जर कोणते कारण असेल तर ते आमची पारंपरिक उपचार पद्धतीच आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगात आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी जलदगतीने वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर महिन्यात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्यात दीडपट वाढली आहे. मसाल्यांच्या निर्यातीत देखील या कालावधीत चांगली वाढ झाली आहे.’

जगभरात आयुर्वेदिक उपचार आणि भारतीय मसाल्यांवर विश्वास वाढत चालला आहे. आता तर अनेक देशांमध्ये हळदीशी संबंधित विशेष पेय पदार्थांचा देखील वापर वाढत चालला आहे. जगातील प्रतिष्ठित मेडिकल जर्नलने देखील आयुर्वेदात नवी आशा पाहिली आहे, भारताकडे आरोग्याशी संबंधित कितीतरी मोठा वारसा आहे. मात्र बहुतेक ज्ञान पुस्तकांमध्ये आहे, शास्त्रांमध्ये आहे आणि थोडे ज्ञान आजीच्या बटव्यात आहे. हे ज्ञान आधुनिक आवश्यकतेनुसार विकसित करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

Protected Content