पाडळसरे धरणासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करू – खासदार उन्मेष पाटील

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर-पाडळसरे धरणाच्या पूर्तीसाठी राज्यशासनाने दिर्घ मुदतीचे कर्ज काढावं किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या सोबत मंत्रालयासमोर आंदोलन करू ! असे खा.उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात खा.उन्मेष पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी धरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून घ्या असे साकडे घातले. यावेळी बोलतांना खा.उन्मेष पाटील यांनी धरणाच्या कामासाठी करीत असलेला पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो प्रस्ताव आणि आवश्यक त्या परवानगी पत्रांची पूर्तता तातडीने करावी किंवा ९ सप्टेंबर १०१९ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे यासाठी मंत्रालयात जाऊन धरण समितीसोबत आंदोलन करावे लागले तरी आंदोलन करू, असे खा. उन्मेष पाटील सांगीतले.

जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी यावेळी धरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले तर रणजित शिंदे,अजयसिंग पाटील, सुनिल पाटील यांनी धरणाची किंमत दरवर्षी शेकडो कोटींनी वाढत आहे असे सांगितले. यावेळी प्रशांत भदाणे, महेश पाटील, समितीच्या कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे, हेमंत भांडारकर,गोकुळ पाटील, रियाज मौलाना, यांचेसह भाजप चे ऍड.व्हि आर पाटील,महेश पाटील, उमेश वाल्हे,युवा कार्यकर्ते तुषार पाटील आदिसह समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अमळनेरकर म्हणतात, खा. साहेब पाडळसरे साठी आंदोलन कराच !
काही दिवसांनी का असेना खासदार उन्मेषदादा पाटील यांना अमळनेर ची आठवण झाली;शिवाय जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते यांची भेट देखील घेतली आहे.पाडळसरे धरण व्हावे यासाठी पाडळसरे जनआंदोलन समिती जीवाचे रान करत आहे.आमदार, खासदार राज्याचे तसेच केंद्राचे मंत्री अशा विविध लोकप्रतिनिधी ना भेटून धरण पूर्ततेसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र निवडणुका तोंडावर आल्या की धूळखात पडलेला एखाद विषय पुन्हा जनतेत आणावा आणि त्यापलीकडे जाऊन भोळ्या भाबळ्या जनतेस वेठीस धरत राजकारणाची पोळी भाजून घ्यावी असेच काहीसे वर्षानुवर्षे चालत आलेल आहे. तेव्हा आता अमळनेरकर पोटतिडकीने म्हणताहेत खासदार साहेब? पाडळसरे धरणासाठी तुम्ही आंदोलन कराच…!

Protected Content