अमळनेरात आज अनोखे आंदोलन : ५१ हजार पत्रांच्या मिरवणुकीची जय्यत तयारी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करावे यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी त्यांना ५१ हजार पत्रे पाठविण्यात येत असून आज या पत्रांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री,जलसंपदा मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील २३ वर्षापासून रखडलेले निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावा म्हणून ९ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. धरण जनआंदोलन समितीने ५१ हजार पेक्षा अधिक पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांना पाठवण्यासाठी पोस्टकार्डची भव्य मिरवणूक आंदोलन बळीराजा ते पोस्ट ऑफिसपर्यंत आयोजित केली आहे.

समितीचे पदाधिकारी अमळनेर शहरात व तालुक्यात प्रचार फेरी करीत असून गावोगावी दवंडीही दिली जात आहे.आंदोलनास अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघासह अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
अमळनेर तालु्यातील हजारो शेतकरी,शेतकरी पुत्र विद्यार्थी विद्यार्थीनीनी तसेच हमाल मापाडी, व्यापारी, शिक्षक,वकील, महिला मंडळ,सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष ,पक्ष कार्यकर्ते यांनी लिहिलेली विक्रमी ५१ हजारापेक्षा अधिक पोस्ट कार्ड असलेली बैलगाडी महात्मा बळीराजा स्मारकापासुन १२ वाजता निघेल.

विश्रामगृह मार्गे बस स्टँड,पाचपावली देवी मंदिर,लालबाग पाणी टाकी,म्हाराजा अग्रसेन चौक,पोस्ट ऑफिस येथे सभा होईल. या सभेत विक्रमी ५१ हजारापेक्षा अधिकची पत्र पोस्ट कर्मचार्‍यांना सुपूर्द केली जातील. अमळनेर तालुक्यासह ६ तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सदर मिरवणुकीत सहभागी व्हावे यासाठी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,हेमंत भांडारकर,रणजित शिंदे, हिरामण कंखरे, महेश पाटील, महेंद्र बोरसे, देविदास देसले,प्रशांत भदाणे, प्रताप साळी,रविंद्र पाटील,अँड तिलोत्तमा पाटील,सुशिल भोईटे, गोकुळ बागुल, लोटन पाटील, दिलीप वानखेडे,अजय सिंग पाटील,पुरुषोत्तम शेटे,भरत परदेशी,नरेंद्र पाटील, गौतम सोनवणे, नारायण बडगुजर, गोकुळ पाटील आदींसह कार्यकर्ते प्रचारफेरिद्वारे आवाहन पत्रक वाटप करीत आहेत.

दरम्यान, शहरातील बाजार पट्टा,झामी चौक,बस स्टँड,नगरपालिका,सुभाष चौक, स्टेट बँक परिसरात प्रबोधन फेरिद्वारे प्रचार करण्यात येत आहे. तर समितीचे आर. बी. पाटील हे हातात डफ घेवून गावोगावी दवंडी देत वातावरण निर्मिती करीत आहेत त्यांचेसोबत समितीचे रामराव पवार, सुपडू बैसाने आदि कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे सदस्य प्रविण संदानशिव, प्रसाद चौधरी हे रिक्षावर लावलेल्या भोंग्यांमधून शहराच्या कानाकोपर्‍यात जावून पाडळसे धरणाच्या विक्रमी पत्रलेखन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.

पाडळसे धरणाच्या पत्र लेखन आंदोलनास उद्धव ठाकरे शिवसेना,आम आदमी पक्ष यांनी पाठिंबा जाहीर केला असून,कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजप पक्षासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही पक्षभेद विसरून तालुक्याच्या आंदोलनात सक्रिय झालेले आहेत. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघासह अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशननेही पाठिंबा जाहीर केला असून बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रथमेश पवार यांनी सदर प्रश्नासाठी भेट घेवून पत्र दिले आहे.अमळनेर तालुका मराठा समाज, फुलमाळी समाज, कांच माळी समाज, तेली समाज,मुस्लिम समाजासह अनेक समाज मंडळांनी पत्रलेखन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

सदर भव्य मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन धरण जनआंदोलन समितीने केले आहे.

Protected Content