रेल्वेच्या जमीनीची होणार विक्री; ऑनलाईन लिलावाची घोषणा

 

नवी दिल्ली । रेल्वे प्रशासनाची मालकी असणार्‍या देशभरातील मोक्याच्या जागा आता विक्री अथवा लीजच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना हस्तांतरीत करण्यात येणार असून दिल्लीतील एक अतिशय महागड्या अशा भूखंडाच्या लिलावापासून याला सुरूवात होणार आहे.

केंद्र सरकारने रेल्वेच्या मालकीच्या दिल्लीमधील तीस हजारी मेट्रो आणि काश्मिरी गेजच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीमधील महागडी जमीन खासगी कंपन्यांना लीजवर देण्याची तयारी सुरू केली आहे.यासाठी ऑनलाइन लिलावही जाहीर केले आहे. ऑनलाइन बोली लावण्यासाठीची अखेरची तारीख २७ जानेवारी २०२१ आहे. ही जमीन सुमारे २१ हजार ८०० स्क्वेअर मीटर आहे. या जमिनीसाठी ३९३ कोटी एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

या जमिनीवर पीपीपी मॉडेल अंतर्गत पाच वर्षांत कॉलनी तसेच मॉल आणि दुकाने बांधण्यात येणार आहे. सरकारने देशभरात याच प्रकारे ८४ रेल्वे कॉलनी विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने वाराणसीमध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत वसुंधरा लोको रेल्वे कॉलनीच्या पुनर्विकासासाठी ऑनलाइन बोली आयोजित केल्या होत्या. या योजनेंतर्गत एकूण जमीन २.५ हेक्टर एवढी ठेवण्यात आली आहे. यापैकी १.५ हेक्टर जमीन रेल्वे कमर्शियल कॉम्प्लेक्स विकसित करण्याचा विचार आहे. यामुळे आता रेल्वेच्या जागांचे खासगीकरण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content