पाचोऱ्यात मंगल कार्यालय चालकांवर दंडात्मक कारवाई

 

पाचोरा, प्रतिनिधी ।   जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सभा, सोहळे, विवाह, मोर्चे करण्यासंबंधी विशेष बंधने घालून देण्यात आले आहेत. मात्र ही बंधने झुगारणाऱ्या मंगल कार्यालयाच्या मालकास १० हजारचा तर एका लॉन्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही म्हणून दंड आकारण्यात आला. 

पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल या मंगल कार्यालयात विवाह समारंभास ४०० ते ५०० नागरिकांची गर्दी आढळून आल्याने मंगल कार्यालय मालकास १० हजार दंड करण्यात आला. तसेच स्वामी लॉन्स येथे लोकांची गर्दी कमी असली तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व मास्कचा वापर कमी लोकांनी केल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने २ हजार रुपये दंड आकारला. पाचोरा शहरात मंगल कार्यालय मालकांवर प्रथमच दंडाची कारवाई झाल्याने त्यांच्यात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.  मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या सुचनेनंतर करनिरीक्षक साईदास जाधव यांनी पाचोरा शहरातील संपूर्ण मंगल कार्यलयास लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी न जमू देणे, प्रत्येकाने मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे असे आशयाचे नोटिसा बजावल्या होत्या. या व्यतिरिक्त रविवारी सकाळी साईदास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूचनांचे पालन न करण्याच्या मंगल कार्यालयात जाऊन मालकांना तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी आदेशाचे पालन न करता भडगाव रोडवरील आशीर्वाद हॉलमध्ये ४०० ते ५०० वऱ्हाडी आढळून आल्याने मालक प्रदीप महालपुरे यांना नगरपालिका प्रशासनाकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. येथून जवळच असलेल्या स्वामी लॉन्स येथील विवाह समारंभास ५० ते ६० वऱ्हाडी उपस्थित होते. मात्र त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मस्कही लावलेले नसल्याने मंगल कार्यालय मालक दत्ता सोनार यांना २ हजार रुपये दंडाची पावती आकारण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, सहायक फौजदार नंदकुमार जगताप, कॉन्स्टेबल किशोर पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, नगरपरिषदेचे करनिरीक्षक साईदास जाधव, कर्मचारी विजेंद्र निकम, आकाश खैरनार, गणेश अहिरे, अनिल वाघ, यांनी साथरोग आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने पाचोरा शहरात पहिल्यांदाच ही कारवाई झालेली असल्याने मंगल कार्यालय मालकांचे धाबे दणाणले आहे. तर रविवारची सुटी असतांनाही पालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Protected Content