पाचोरा, प्रतिनिधी । जातीय अभिनिवेश बाजूला सारून हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन सामाजिक सद्भावना राखणे आवश्यक आहे. प्रभू श्रीराम सामाजिक सद्भावाचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य योगेश्वर गर्गे यांनी केले. पाचोरा येथील आशिर्वाद हॉल येथे आयोजित सामाजिक सद्भाव बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे तालुका संघचालक दिनेश अग्रवाल तसेच मुख्य अतिथी म्हणून सकल जैन समाजाचे संघपती रतनलाल संघवी व्यासपीठावर उपस्थित होते.
वनवासी व वंचितांना सोबत घेऊन दृष्ट प्रवृत्ती आणि अन्यायाविरुद्ध लढणारे श्रीराम कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित राहत नाहीत तर ते सकल मानवतेचा पुरस्कार करणारे आदर्श राजा ठरतात असे योगेश्वर गर्गे यांनी सांगितले. सामाजिक विषमता दूर होणे काळाची गरज असून कोणत्याही समाज घटकांसाठी संकटसमयी इतर समाज बांधवांनी मदतीला धावून येणे हाच खरा मानवतावाद आहे. अशा प्रकारचा सामाजिक सद्भाव निर्माण झाल्यास ते सर्वोत्कृष्ट राष्ट्र चित्र ठरेल त्यासाठी सामाजिक भेद दूर करून आदर्श समाज निर्माण करूया असे गर्गे यांनी यावेळी सांगितले. श्री. प्रभुराम तसेच भारत माता प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सद्भभाव बैठकीला विविध समाजातील २० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांनी सामाजिक स्तरावर सुरू ठेवलेल्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक उपक्रमांचे निवेदन यावेळी केले. प्रसंगी संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य योगेश चौधरी, सुनिल सराफ, संतोष मोरे, तालुका कार्यवाह संतोष माळी, मनिष काबरा, महावीर गौड, सुनिल पाटील, महेश तोतला, राजू बाळदकर, कुंदनलाल बाफना, अनुप अग्रवाल, मोहन अग्रवाल, गिरिष बर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.