पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपरिषदेतर्फे पथविक्रेत्यांना योजनांची माहिती देणारे शुभेच्छापत्रक भेट म्हणून देण्यात आले.
पाचोरा नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना पथविक्रेतांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाचोरा शहरातील पथविक्रेते, भाजीपाला विक्रेते, फ्रुट विक्रेते अशा अनेक व्यवसायिकांना नगरपरिषदे अंतर्गत राबवण्यात येणार्या योजनेच्या माध्यमातून या व्यवसायिकांना तीन टप्प्यात राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देत आहे.
या योजनेचा आतापर्यंत दुसरा टप्पा या व्यवसायिकांना मिळवून देण्यात आला आहे. व यानंतर पुढील तिसरा टप्पात ५० हजारापर्यंत असेल अशी माहिती पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांनी दिली. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २१७ पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन दुसर्या टप्प्यात १५ पथविक्रेत्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. यापुढे ही या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
या कार्यक्रमा वेळी सदर योजनेअंतर्गत परिचय बोर्ड व शुभेच्छापत्र यावेळी पथविक्रेत्यांना देण्यात आले. या प्रसंगी उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, शहर प्रकल्प अधिकारी संदीप भोसले, समुदाय संघटक कुणाल तायडे, कृष्णा व्यास यांचेसह पथविक्रेते व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते .