पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर पुस्तक लिहिणं सुरु आहे — फडणवीस

 

औरंगाबाद: प्रतिनिधी । या पुढे पहाटे शपथ घेणार नाही, आता तुम्हाला योग्य वेळी शपथविधी दिसेल,’ असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असा मिश्किल टोलाही लगावला शिवाय, पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर पुस्तक लिहिणं सुरु आहे, असंही ते म्हणाले .

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजच्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधी सोहळ्याचा संदर्भ देत एक सूचक विधान केलं आहे.

राज्यात सध्या पदवीधर निवडणुकांची धामधुम आहे. या अनुषंगाने सर्वच पक्षातील नेते प्रचारात गुंतले आहेत. देवेंद्र फडणवीस हेदेखील प्रचारासाठी औरंगाबाद येथे आले आहेत. तिथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार चार वर्ष नाही आणखी २० वर्ष हे सरकार चालवू, असं विधान केलं होतं. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी, त्यांना जनतेने निवडून दिलेले नाहीये, हे त्यांनाही माहितीये. हे बेईमानी करुन आलेले सरकार आहे. त्यामुळं हे सरकार किती काळ चालेल याबाबत मी भाष्य करणार नाही, ते आपोआप कळेल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘मराठवाडा व विदर्भाचे चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचे चित्र बदलू शकत नाही, हे ज्ञात असल्यामुळेच काँक्रिटच्या रस्त्यांपासून ते गावोगावी पाणी पोहचवण्यासाठी आणि समुद्रात वाया जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱयात आणण्यापासून ते मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाड्यात तब्बल ५० हजार कोटींची कामे सुरू केली; परंतु सत्ताधाऱयांनी बहुतांश कामे बंद पाडली आहेत. तर, अनेक कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत आणि मुख्य म्हणजे सत्ताधाऱयांच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला

Protected Content