जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजाच्या उत्थानासाठी पत्रकारितेकडे सजगपणे आणि प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेला सदिच्छा भेटी प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. सुधीर भटकर, डॉ .गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, अनिकेत पाटील उपस्थित होते. प्रारंभी संचालक डॉ. भटकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. दुसाने यांचे पुष्पगुच्छ,पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
पुढे बोलताना डॉ . दुसाने म्हणाले की, शासन, प्रशासन आणि समाज तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून जिल्हा माहिती अधिकारी काम करीत असल्याने साहजिकच त्यांचा संपर्क प्रत्येकांशी येतो.त्यामुळे त्याला पारदर्शक,प्रामाणिकपणेआणि सातत्याने कार्यरत रहावे असे सांगून डॉ. दुसाने यांनी त्याचा पत्रकारिता ते प्रशासकीय सेवा असा प्रवास उलगडला. प्रास्ताविकात संचालक प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी विद्यापीठासह प्रशाळेच्या प्रगतीचा उहापोह केला. सूत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे तर आभार डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.